बंगळुरू : मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने कर्नाटकातील पक्षाच्या संघटनेत मोठा बदल केला आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार यांची कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी बुधवारी माहिती दिली आहे.
केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शिवकुमार यांची नियुक्ती केली आहे.
तसेच ईश्वर खंद्रे, सतीश झारकीहोली आणि सलीम अहमद यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. यासह अजयसिंग यांना विधानसभा, तर एम. नारायणस्वामी यांची विधान परिषदेच्या मुख्य सचिव म्हणून नेमणुक केली आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कायम राहतील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. दिनेश गुंडुराव यांच्या जागी डीके शिवकुमार यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील कॉंग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांना बंगळुरु येथील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. कर्नाटक हा मध्य प्रदेशच्या राजकीय गेम प्लॅनचा केंद्रबिंदू आहे.
कर्नाटक सरकारचे माजी मंत्री असलेले डीके शिवकुमार हे पक्षाचे संकटमोचक मानले जातात. अशा परिस्थितीत डीके शिवकुमार यांना राज्य संघटनेची जबाबदारी देणे ही पक्षाच्या प्रमुख निर्णयांपैकी एक मानली जाते.
दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी अनिल चौधरी
दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी (डीपीसीसी) अनिल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिषेक दत्त, शिवानी चोप्रा, जयकिशन, मुदित अग्रवाल आणि अली हसन यांची नेमणुक उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुभाष चोप्रा यांनी फेब्रुवारीमध्ये दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सलग दुसऱ्या एकही जागा जिंकता आली नाही.