मुंबई – राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. त्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर भेट दिली. परंतु लोढा यांच्या भेटीमागचे कारण समजू शकले नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपासून भाजपचे नेते राज ठाकरे यांना वारंवार भेट देताना पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. यावेळी शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा मांडण्यात आला.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये अटीतटीची लढत होऊन जागांचा फरक असल्यास मनसे महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दुसरीकडे भाजप नेत्यांच्या भेटीमुळे भाजप-मनसेची छुपी युती होऊ शकते, असे देखील सांगितले जात आहे.