नवी दिल्ली – राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या पुन्हा 40 इतकी करण्यात आली आहे. करोना संकटाची तीव्रता कमी झाल्याने निवडणूक आयोगाने ती संख्या जैसे थे केली.
करोना संकटाचा विचार करून निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2020 मध्ये स्टार प्रचारकांची संख्या कमी केली. त्यानुसार ती 40 वरून 30 इतकी झाली. तो निर्णय उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांसाठीही लागू करण्यात आला. आता स्टार प्रचारकांची संख्या जैसे थे करण्यात आल्याचा लाभ राजकीय पक्षांना उत्तरप्रदेश आणि मणिपूरमध्ये मिळणार आहे.
उत्तरप्रदेशातील सातपैकी अखेरच्या तीन टप्प्यांसाठी आणि मणिपूरमधील दोन्ही टप्प्यांसाठी राजकीय पक्ष 40 स्टार प्रचारकांच्या याद्या देऊ शकतील. उत्तराखंड, गोवा आणि पंजाब या तीन राज्यांमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्टार प्रचारकांचा खर्च राजकीय पक्षांना करावा लागतो. तो खर्च उमेदवारांच्या नावे जमा होत नाही.