नागपूर – देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर एका कार्यक्रमात दिली होती. तशीच ऑफर आज नागपुरातील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे राज्यमंत्री परिणय फुके यांना दिल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. कॉंग्रेसचे नेते बबनराव तायवाडे यांच्या 67 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिणय फुके यांनाही निमंत्रण असल्याने ते तेथे गेले होते. ते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेसच्या लोकांचीच अधिक गर्दी असल्याने त्या संबंधात बोलताना फुके म्हणाले की, मी येथे ऑड मॅन आऊट असल्यासारखा दिसतो आहे. तोच संदर्भ घेऊन अशोक चव्हाणांनी त्यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची जाहीर ऑफर दिली. जर तिथं काही होत नसेल तर तुम्ही इकडेही येऊ शकता आम्हाला काही अडचण नाही असे अशोक चव्हाण फुके यांना उद्देशून म्हणाले.