पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) गेल्या 16 वर्षांपासून क्लर्क पदासाठी भरती झाली नसून सुमारे 379 पदे रिक्त आहेत. चालक आणि वाहक यांची सरळसेवा परिक्षेद्वारे भरती केली जाते पण, क्लर्क पदासाठी अशी कोणतीही परिक्षाच घेतली जात नसून खात्यार्तंगत जागा भरल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “पीएमपी’मार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सेवा दिली जाते. पीएमपीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, बसेसची संख्या देखील वाढत आहेत. पण, पीएमपीत चालक आणि वाहक पदे रिक्त असल्यामुळे बऱ्याच वेळा काही मार्गावरच्या बसच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. अशात पीएमपी प्रशासनाने क्लर्कची पदे रिक्त असल्यामुळे काही वाहक आणि चालकांची क्लर्क म्हणून नियूक्ती केली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पीएमपीच्या वाहतूक सेवेवर होत आहे. 2013 मध्ये सीआयआरटी संस्थेने तयार केलेल्या व संचालक मंडळाने गठीत केलेल्या समितीने आस्थापना आराखड्यानुसार 510 क्लर्क जागांची शिफारस केली होती. पण, सध्या केवळ 131 क्लर्क कर्मचारी काम करत आहेत. येत्या काळात काही कर्मचारी निवृत्त होणार आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याने क्लर्क म्हणून काम करत आहेत. 2006-07 मध्ये 106 क्लर्क जागांची भरती केली होती. त्यानंतर 2021 मध्ये प्रशासनाने अनुकंपतत्वावरील 29 उमेदवारांची नियुक्ती क्लर्क पदावर केली आहे. 2021 मध्ये झालेल्या भरतीत सर्व नियम डावलून पदभरती झाल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. पीएमपीतील रिक्त जागांची माहिती मागविली आहे. रिक्त जागांची माहिती मिळाल्यानंतर काही जागा खात्यातर्गंत भरल्या जाणार आहेत. तर वाहकांच्या रिक्त जागा सरळसेवेने भरणार आहे. – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी नियम काय सांगतो राज्य शासन आणि महापालिकेच्या अखत्यारीतील रिक्त पदांमनधील, 50 टक्के पदे सरळसेवा परीक्षेद्वारे आणि 25 टक्के पदे पदोन्नतीने आणि 25 टक्के पदे खात्यातर्गंत सरळसेवेने भरावीत. मंजूर पदे 510 भरलेली पदे 131 रिक्त पदे 379