पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला धोबी पछाड; ममतांची हॅट्ट्रिक

कोलकाता – देशातील संपूर्ण राजकीय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने एक हाती वर्चस्व राखले आहे.

मोठ्या विजयाची अपेक्षा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मात्र मोठा अपेक्षा भंग झाला आहे. भाजपने सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये जितके यश मिळवले होते तेवढे यशही राखणे या पक्षाला यावेळी जमले नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये 121 विधानसभा सिगमेंट्‌समध्ये भाजपला आघाडी होती. पण यावेळी त्यांना शंभरीही गाठता आली नाही. उलट ममतांना सन 2016 च्या विधानसभा निवडणुकीचाच करिष्मा यावेळीही दाखवून सर्वांनाच चकित केले आहे.

पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीबाबत एक्‍झिट पोलमध्ये जी भाकिते वर्तवण्यात आली होती, त्यानुसार तृणमूल कॉंग्रेस व भाजपमध्ये कॉंटे की टक्‍कर असल्याचे संकेत देण्यात आले होते. ममतांच्या पक्षाला अगदी अत्यल्प बढत मिळेल, असेही भाकित यातून करण्यात आले होते.

पण प्रत्यक्ष निकालात मात्र हे भाकित साफ उलटेपालटे झाले आहे. रिपब्लिक टीव्हीसारख्या सरकारधार्जिण्या वाहिन्यांनी भाजपला पश्‍चिम बंगालमध्ये बहुमत मिळेल, असे भाकित केले होते. ते साफ खोटे ठरवत पश्‍चिम बंगालच्या जनतेने ममतांची प्रचंड बहुमतांनी पाठराखण केल्याचे दिसून आले आहे.

बंगालच्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात ममतांचाच जोर राहिला. कॉंग्रेस आणि डाव्यांची आघाडी मात्र या निवडणुकीत सपशेल अपयशी ठरली आहे. भाजपचे गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन आमदार निवडून आले होते व डाव्या आघाडीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले होते.

तथापि, या निवडणुकीत मात्र डावी आघाडी आणि कॉंग्रेसचा येथे सफाया झालेला पाहायला मिळाला, त्यांच्या जागा भाजपने पटकावल्याचे निकालाच्या विश्‍लेषणातून दिसून आले आहे. निवडणूक काळात भाजपने येथे मोठ्या प्रमाणात यंत्रणा उतरवली होती. तृणमूल कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी फोडाफोडीही केली होती.

ऐनवेळी भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांची मात्र आता चांगलीच गोची झालेली पाहायला मिळत आहे. मोदी-शहांच्या सभांचा येथे धुरळा उडवून देण्यात आला होता. त्यांनी प्रचंड मोठ्या गर्दीत रोडशोही केले होते.

मतदान बंदोबस्तासाठी राज्यातील पोलीस दलाला डावलून केंद्रीय राखीव दलांना प्रत्यक्ष मतदान केंद्रांवरील बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली होती. हा एक वादाचा विषय बनला होता. तसेच निवडणूक आयोगाने दिलेले अनेक आदेश पक्षपाती स्वरूपाचे असल्याचीही टीका करण्यात येत होती. ही सारी आव्हाने पार करून ममतांच्या पक्षांने येथे घसघशीत बहुमत मिळवत आपली शानदार हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.