WestBengal Results | निकालानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘बंगालने देश वाचवला..’

कोलकाता, दि. 2 – हा पश्‍चिम बंगालमधील जनतेचा विजय आहे. देश वाचवल्याबद्दल मला माझ्या राज्यातील जनतेचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

बॅनर्जी कोलकात्यात पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोग आमच्याशी वाईट वागला. ते भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखे वागले. खेल होबे आणि जय बंगला या दोन घोषणांनी खूप काम केले. भारतीय जनता पक्षाने घाणेरडे राजकारण केले. त्यांनी निवडणूक हरली.

नंदिग्रामविषयी त्या म्हणाल्या, नंदिग्रामविषयी तुम्ही काळजी करू नका. लढ्यात काहीतरी बलीदान द्यावे लागते. मी नंदिग्राम लढले, कारण ती एक चळवळ होती. लोकांना जे वाटेल त्याचा निर्णय ते देतील. जो निकाल येईल तो मी स्वीकारेन. आम्ही फेरमतमोजणीची मागणी करू आणि आवश्‍यकता भासल्यास न्यायालयात जाऊ. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात काही गडबड झाल्याची मला माहिती मिळाली आहे. पण आम्ही 221 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत आणि भाजपा ही निवडणूक हरला आहे.

करोनाला पराभूरत करण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. सध्याच्या स्थितीचा विचार करून शपथविधी छोटेखानी असेल. आम्ही प्रत्येकाल मोफत लस देऊ. सर्वांना मोफत लस द्यावी अशी केंद्राकडे मागणी केली आहे. जर ती पूर्ण केली नाही तर आम्ही गांधी मुर्ती जवळ धरणे आंदोलन करू, असे त्या म्हणाल्या.

कोणीही विजयी मिरवणुका काढू नयेत. करोनाला पराभूत केल्यानंतर आपण ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मोठा विजयी मेळावा घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.