भाजप सर्वधर्मीयांना सामावून घेणारा पक्ष – कांबळे

पुणे – भाजप हा सर्वधर्मीयांना सामावून घेणारा पक्ष असून जाती-धर्मापलीकडे जाऊन विकासाचा मार्ग पक्षाने आखला आहे. तळागाळातील नागरिक विकासाची फळे चाखत असून येत्या काळात विकासाचे व्यापक चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे उमेदवार सुनील कांबळे यांनी केले.

कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्च, बाबाजान दर्गा तसेच विविध देवी-देवतांच्या मंदिरांसह बुद्ध विहारांना कांबळे यांनी रविवारी भेट दिली. होली एंजल चर्चचे बिशप पॉल दुपारे यांनी कांबळे यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कांबळे यांच्या शुभचिंतनासाठी प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी फादर अभिषेक पारकर, ठाकूर मदनमोहन, राजन नायर, मोसद कलकटी आणि ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

त्यानंतर कांबळे यांनी बाबाजान दर्ग्यात जाऊन चादर चढवून माथा टेकवत आशीर्वाद घेतले. दर्ग्यात सलीम पटेल, नासीर खान यांनी कांबळे यांचे स्वागत केले. कुरेशी मशिदीपासून सुरू झालेली ही पदयात्रा भोपळा चौक, बाबाजान चौक, सेंटर स्ट्रीट, शितळादेवी, जुना मोदीखाना, एमजी रोड मार्गे गेली. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पदयात्रेचा समारोप झाला. यादरम्यान कांबळे यांनी बुद्ध विहारांनाही भेट दिली. तसेच गणपती, मारूती आणि देवीच्या मंदिरात जाऊनही आशीर्वाद घेतले. आरपीआय (ए) कार्यकर्त्यांनी पदयात्रेत मोठ्या संख्येने भाग घेतला.

सदानंद शेट्टी, नगरसेवक दिलीप गिरमकर, नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, हिमाली कांबळे, शैलेंद्र चव्हाण, राजू श्रीगिरी, भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदूरकर, किरण क्षीरसागर, अमित वोहरा, शैलेश बीडकर, किशोर शिंगवी, साची शिंगवी, पुरुषोत्तम पिल्ले, दीपक कुऱ्हाडे, मनोज भावकर यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.