पर्वतीत राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा

अश्‍विनी कदम यांना राजकीय फायदा होणार

सहकारनगर – निवडणुकांच्या तोंडावर पर्वती विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाआघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आता पर्वती विधानसभा मतदारसंघात मनसेने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला राजकीय फयदा होणार आहे.

“समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्त्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या अश्‍विनी कदम या उमेदवार असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक रविवारी पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नीलेश ढमढेरे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष महेश शिंदे, नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादीचे पर्वती मतदारसंघ अध्यक्ष नितीन कदम, मनसेचे पर्वती उपविभाग प्रमुख जयराज लांडगे, विभाग प्रमुख राहूल गवळी, सतीश तावरे, सनी जगताप, विकी अमराळे, सनी खरात, संतोष चव्हाण, कुशल शिंदे, अभिजित टेंबेकर, विशाल शिंदे, महेश जाधव यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जयराज लांडगे म्हणाले, मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे पर्वतीमध्ये अश्‍विनी कदम यांचा विजय निश्‍चित आहे. यामध्ये मनसेचा सिंहाचा वाटा असेल. तसेच उच्चशिक्षित असणाऱ्या शिक्षिका अश्‍विनी कदम यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. कदम म्हणाल्या, मनसेच्या पाठिंब्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानते. ज्येष्ठ नागरिक आणि सर्वधर्मीय समाज घटकांची दिलेला पाठिंबा यामुळे पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)