अहमदाबाद: गुजरातचे मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांची विधानसभेवरील निवड मंगळवारी रद्दबातल ठरवण्यात आली. निवडणुकीत चुडासमा यांच्याकडून गैरप्रकार झाल्याचे मान्य करत गुजरात उच्च न्यायालयाने तो निर्णय दिला. त्या दणक्यामुळे गुजरातमधील भाजप सरकारची नाचक्की होणार आहे.
न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांनी कॉंग्रेस नेत्याच्या याचिकेवर सुनावणी घेताना चुडासमाची निवड रद्द केली. ढोलका विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार अश्विन राठोड यांनी भाजप नेत्याच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणूकीत चुडासमा ३२७ मतांच्या फरकाने जिंकले होते.
सध्या चुडासमा विजय रुपाणी यांच्या सरकारमधील शिक्षण, कायदा व न्याय, विधिमंडळ व संसदीय कार्य इत्यादी विभागांचे प्रभारी आहेत. या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते भरत सोलंकी म्हणाले की, ढोलका विधानसभा निवडणूक २०१७ च्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सत्यमेव जयते.