चंदिगढ – भाजपने आपल्याला पैसे आणि केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा आरोप आम आदमी पार्टीचे पंजाब प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी केला आहे. पंजाबमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला ही ऑफर देण्यात आली होती, असे मान म्हणाले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्याने चार दिवसांपूर्वी आपल्याशी संपर्क साधला होता आणि भाजपमध्ये सामील होण्यासाठी काय घ्याल? अशी खुली ऑफर दिली होती, असे विचारले होते, असे मान यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले. “तुम्हाला पैसे हवे आहेत का?’ असा प्रश्नही भाजपच्या नेत्याने आपल्याला विचारला होता. आपण जर भाजपमध्ये सामील होणार असू तर केंद्रीय मंत्रीपद देण्याची तयारीही या नेत्याने दर्शवली होती, असेही मान म्हणाले.
“मी मिशनवर आहे, कमिशनवर नाही.’ असे उत्तर आपण भाजपच्या या नेत्याला दिल्याचे मान यांनी सांगितले. भाजपच्या या नेत्याचे नाव विचारले असता आपण योग्यवेळी हे नाव जाहीर करू असे मान म्हणाले.
भाजपला पंजाबमध्ये काहीही आधार नाही. भाजपच्या नेत्यांना पंजाबमधील गावांमध्ये प्रवेश दिला जात नाही. गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या शेतीविषयक कायद्यांमुळे भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करवा लागतो आहे, असेही ते म्हणाले.