गुवाहाटी – आसामचे भाजपचे मंत्री अशोक सिंघल यांनी गुवाहाटीत ज्या पंचतारांकित हॉटेलात शिवसेनेचे बंडखोर आमदार वास्तव्याला आहेत तेथे भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. सिंघल हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते राज्याचे गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे मंत्री आहेत.
शनिवारी रात्री त्यांनी या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, पण या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान स्वत: सिंघल यांनी या आमदारांची भेट घेऊन चर्चा केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण त्यानीं चर्चेचा तपशील सांगण्यास मात्र नकार दिला आहे. 16 असंतुष्ट आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा जारी करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही बैठक झाली हे विशेष.
शिवसेनेच्या या बंडाशी आपला काही संबंध नसल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जात असले तरी या प्रकरणातील भाजप कनेक्शन लपुन राहिलेले नाही. 22 जून रोजी गुवाहाटी येथील बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमदारांचे स्वागत करण्यासाठी भाजपचेच एक खासदार आणि एका आमदाराला तिकडे पाठवण्यात आले होते. आसाम पोलिसांनी हॉटेलच्या खाजगी रक्षकांकडून सुरक्षा ताब्यात घेतली आहे आणि कोणालाही हॉटेलच्या आवारात प्रवेश करू दिला जात नाही.