कोलोंबो – श्रीलंकेत पेट्रोल 50 रुपयांनी आणि डिझेल 60 रुपयांनी पुन्हा महागले आहे. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली ही तिसरी दरवाढ आहे. सरकारी मालकीच्या सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ही दरवाढ जाहीर केली आहे. लंका आयओसी या कंपनीनेही याच दरांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे.
यापूर्वी 24 मे रोजी इंधनाची दरवाढ करण्यात आली होती. तेंव्हा पेट्रोलच्या दरांमध्ये 24 टक्के आणि डिझेलच्या दरात 36 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. 19 एप्रिलपासून श्रीलंकेत तिसऱ्यांदा इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. आता श्रीलंकेत पेट्रोल 470 रुपये लीटर आणि डिझेल 460 रुपये प्रति लीटर या दराने मिळणार आहे.
परदेशातून आयात होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या मालाची आवक व्हायला उशीर झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने म्हटले असल्याचे श्रीलंकेचा उर्जा मंत्री कांचना विक्रमसिंघे यांनी सांगितले.