कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला असल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील निमता भागात गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. या हल्ल्यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचे आज निधन झाल्याचे भाजपने म्हटले आहे.
या घटनेवरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निमता पोलीस स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली आणि एम.बी.रस्त्यावर टायर पेटवून देऊन निषेधही नोंदवला. मात्र या हल्ल्यामागे आपले कार्यकर्ते नव्हते. संबंधित महिलेचा मृत्यू वृद्धत्वामुळे झाला असावा, असा दावा तृणमूल कॉंग्रेसने केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शोवा मुजुमदार यांच्या कुटुंबीयांना झालेल्या वेदना ममता दिदींना दीर्घकाळ भोगाव्या लागतील. भविष्यातील हिंसाचारमुक्ततेसाठी बंगाल संघर्ष करेल. आपल्या माता, भगिनींच्या सुरक्षेसाठी बंगाल संघर्ष करेल, असे शहा यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
शोवा मुजुमदार यांच्या घरावर 27 फेब्रुवारी रोजी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या मुजुमदार यांच्यावर गेले 27 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झला असे केंद्रीय मंत्री देबश्री चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.
मात्र या अपघाताचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि भाजप या घटनेतून राजकीय लाभ मिळवू पहात आहे, असे तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटले आहे. कोणताही मृत्यू दुर्दैवी आणि वेदनादायी असतो. या हल्ल्यामध्ये तृणमूल अजिबात सहभागी नाही. मुजुमदार यांचा मृत्यू वृद्धत्वामुळे झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.