मोठी बातमी : पुण्यात खासगी रूग्णालयांचे 80 टक्के बेड राखीव

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

पुणे – शहरात नव्याने करोना बाधित रूग्णांचा आकडा दैनंदिन 5 हजारांच्या उंबरठयावर पोहचल्याने शहरात ऑक्‍सिजन तसेच व्हेंटीलेटरची गरज भासणाऱ्या रूग्णांना बेड मिळत नसल्याने शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी हॉस्पीटलचे 80 टक्के बेड करोना रूग्णांवर उपचारासाठी तातडीनं राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रमुख 23 हॉस्पीटलचे बेड 31 मार्च पूर्वी राखीव ठेवण्यात येणार असल्याने पुढील दोन दिवसात करोनाग्रस्तांसाठी 2100 बेड उपलब्ध होणार आहेत.

या 23 हॉस्पीटलकडे 80 टक्केनुसार, 4243 बेड असून त्यांच्याकडून आधीच 40 टक्के बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यावर करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तर या हॉस्पीटल सोबतच उर्वरीत लहान हॉस्पीटलचे बेडही महापालिका टप्प्या टप्प्याने राखीव करणार आहे.

शहरात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यातील 75 ते 80 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे असली तरी एकूण बाधितांच्या तुलनेत ऑक्‍सिजन तसेच व्हेंटीलेटर्सची गरज भासणाऱ्या रूग्णांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे अशा रूग्णांना घेऊन नातेवाईक शहरातील वेगवेगळया रूग्णालयांच्या फेऱ्या करत असून बेड मिळत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहेत.

नागरिकांना बेड मिळावेत म्हणून महापालिकेने जंबो कोवीड सेंटर सुरू केले असून डॅशबोर्डच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र, दैनंदिन वाढता आकडा पाहता, पुन्हा मागील वर्षी सप्टेंबर 2020 सारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून सोमवारी झालेल्या बैठकीत राखीव बेडची संख्या 40 टक्केवरून 80 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे प्रमुख 23 रूग्णालयांना 80 टक्के बेड करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या बेडचे नियंत्रण करण्यासाठी तसेच ते राखीव आहेत का ? इतर आजाराच्या रूग्णांसाठी ते वापरले जातात का याची तपासणी करण्यासाठी या पूर्वीच या रूग्णालयांमधे स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

20 टक्के बेडही तातडीच्या रूग्णांसाठीच

दरम्यान, या अदेशात उर्वरीत 20 टक्के बेडही रूग्णालयांनी केवळ तातडीच्या रूग्णांसाठीच द्यावेत असे नमूद करण्यात आले आहे. तसेच खाटा उपलब्ध होताच तातडीनं करोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू करावेत, त्यासाठी आयसोलेशन वॉर्ड, ऑक्‍सिजनयुक्त खाटा, आयसीयू विदाऊत वेंटीलेटर तसेच व्हेंटीलेटरसह आयसीयू बेडही तत्काळ सुरू करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.