कोलकाता – पश्चिम बंगाल मधील भवानीपुर मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल या महिला उमेदवाराला मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांची उमेदवारी पक्षातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
व्यवसायाने वकिल असलेल्या प्रियांका यांनी पश्चिम बंगाल मधील निवडणुकीनंतर राज्यात जो हिंसाचार झाला आहे, त्याच्या विरोधात कोलकाता हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
त्यामुळे त्या भाजप नेतृत्वाच्या जवळ गेल्याचे मानले जाते. समशेरगंज पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे मिलन घोष आणि जांगीपुरच्या जागेसाठी सुजित दास यांचीही उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी या तिन्ही ठिकाणी मतदान होत असून तेथील मतमोजणी 3 ऑक्टोबरला होणार आहे.