कोलकता – पश्चिम बंगालमधील भाजपचे उमेदवार दीपक हल्दर यांनी शुक्रवारी समर्थकांसह आपल्याला एका गटाने मारहाण केल्याचा आरोप केला. निवडणुकीआधी हल्दर यांनी सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
डायमंड हार्बरचे विद्यमान आमदार असणाऱ्या हल्दर यांना भाजपने त्याच मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. ते काही समर्थकांसमवेत एका ठिकाणी प्रचार करत होते. त्यावेळी एका गटाशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्या गटाने हल्दर आणि त्यांच्या समर्थकांना काठ्यांनी मारहाण केली. त्या हल्ल्यानंतर हल्दर आणि त्यांच्या काही समर्थकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या हल्ल्यामागे तृणमूल असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मात्र, तो आरोप तृणमूलने फेटाळून लावला. हल्दर यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षातून तो हल्ला झाला असावा, अशी प्रतिक्रिया तृणमूलने दिली. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बंगालमधील वातावरण आणखीच तापले आहे. त्याचे हिंसक पडसाद त्या राज्यात उमटत असल्याचे दिसून येत आहे.