करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – रामराजे नाईक निंबाळकर

सातारा – जिल्ह्यात करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करावी. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर चाचण्या प्रयोगशाळेची क्षमता वाढवून कोविडच्या चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी झालेल्या करोना संसर्ग आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, तरुणांना अधिक प्रमाणात कोरोना संसर्ग होत असल्याने त्यांनी शासन व प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी. रुग्णसंख्या वाढत असून, कोणीही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, रुग्णास सहजगत्या बेड उपलब्ध व्हावा याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालकमंत्री पाटील म्हणाले, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या करोना चाचण्या कराव्यात.

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. विवाह समारंभांमधील उपस्थितीवर लक्ष ठेवावे. रात्री 8 वाजल्यानंतर पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. राज्यमंत्री देसाई म्हणाले, विवाह समारंभ, बार, रेस्टॉरंट यांची पोलीस वेळोवेळी तपासणी करतील. नियमांचे पालन होणार नाही, तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल. खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्हा रुग्णलयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यासाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.