प्रशांत जाधव
सातारा – हिंगणे (ता. खटाव) येथील अजय यादव या युवकाने फसवणुक झाल्याची चिठ्ठी लिहून नुकतीच आत्महत्या केली. याप्रकरणात वरकरणी फसवणूक दिसत असली तरी, हा प्रकार खासगी सावकारीचा आहे. खटाव तालुक्यात दहशत माजवणारा खासगी सावकार विलास शिंगाडेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्या तरी त्याच्या दहशतीला बळी पडलेले अनेक अजय आजही सुटकेची वाट पाहत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शिंगाडेचे कारनामे उघड करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
विलास शिंगाडे हा वडूज, कातरखटाव, बनपुरी, येलमरवाडी, डांभेवाडी, बोंबाळे, हिंगणे, एनकूळ या परिसरात खासगी सावकारी करतो. लोकांना बॅंकांकडून सहज कर्जपुरवठा होत नसल्याने किरकोळ गरजांसाठी ते शिंगाडेच्या हातापाया पडतात. थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू सावज आहे, अशा अविर्भावात शिंगाडे कर्ज देत असल्याची चर्चा आहे. कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी तो करतो.
सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून तो कर्जदारांची लूट करतो, अशी चर्चा आहे. खटाव तालुक्यात खासगी सावकरांची यादी मोठी आहे. कमी भांडवलात लाखो रुपये उकळता येते. दरमहा दहा ते 30 टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना कंगाल केले जात आहे. वसुलीसाठी दमदाटी, रात्रीअपरात्री घरात घुसून मारहाण हे प्रकार नित्याचे आहेत. तारण ठेवलेली वस्तू पदरात पडत नाही, तोपर्यंत सावकारी व्याज थांबत नाही. गेल्या काही वर्षांत शेतकरी हे खासगी सावकारांचे सावज ठरत आहेत.
अजय यादव आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केल्यास नेमके कारण समोर येईलच, शिवाय विलास शिंगाडेच्या विरोधात तक्रारींची माळ लागेल. त्यासाठी गरज आहे पोलिसांनी कागद रंगवण्याऐवजी ठोस कारवाई करायची. ते झाल्यास भविष्यात अनेक अजय आत्महत्येपासून परावृत्त होतील. तालुक्यातील कापड व्यापारी, पेट्रोल पंपचालक, बिल्डर, रंगकामाचे ठेकेदार, सरपंचाससह अनेक महिला शिंगाडेच्या सावकारी पाशात अडकले आहेत. त्यामुळे तक्रारदार काय सांगतो, याच्या पुढे जाऊन पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे.
पैशाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी?
सरकारी यंत्रणा खासगी सावकरांना पाठीशी घालत आल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते. खटाव तालुक्यातील एका गावातील महिलेला शिंगाडेने काही रक्कम कर्जाऊ दिली होती; परंतु दुष्काळामुळे शेतात काहीच पिकले नसल्याने सावकाराचे पैसे परत करणे त्या महिलेला शक्य झाले नाही. त्यानंतर शिंगाडेने पैशाच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
डीवायएसपींकडून चालढकल?
कुमठे, ता. खटाव येथील शिखरे कुटुंबाला एका सावकाराने काही रक्कम व्याजाने दिली होती. त्यांनी वेळोवेळी सावकाराला पैसे परत दिले होते; परंतु पैसे वेळत मिळत नसल्याची सबब सांगून त्या सावकाराने त्या कुटुंबाची जमीन हडप केली आहे. त्याबाबत शिखरे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी डीवायएसपींना कारवाई करण्याचा आदेश दिला होता; परंतु डीवायएसपींनी हे प्रकरण सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवल्याचे सांगून, 15 नोव्हेंबर 2020 पासून त्या प्रकरणावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आणखी एक “अजय यादव’ होण्याची वाट ते पाहत आहेत का, अशी शंका उपस्थित होत आहे.