क्रिप्टो करंन्सी प्रकरणात धक्कादायक वळण
तपास तांत्रिक सल्लागारांकडूनच विश्वासघात
जप्त क्रिप्टो करन्सी लंपास
पुणे – क्रिप्टो करन्सीच्या देशातील पहिल्या गुन्ह्यात जप्त केलेले चलन परस्पर आपल्या खात्यात वळवून घेणाऱ्या दोन तांत्रिक तज्ज्ञांना पुणे पोलिसांनी अटक केली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून बिट कॉइनच्या या रेशमी जाळ्याचे शुक्लकाष्ठ एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मागे लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मात्र त्याबाबत अधिकृतपणे काहीही आताच बोलण्यास पोलीस अधिकारी तयार नाहीत. दरम्यान, पोलिसांनी माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात नोटीस बजावल्यानंतर काही तासात हाही गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील ठाकरे सरकार आक्रमक झाल्याचे मानण्यात येत आहे.
देशामध्ये क्रिप्टो करन्सी संदर्भात पहिला गुन्हा पुणे शहरात 2018 मध्ये दाखल झाला होता. या गुन्हयात करोडो रुपयांचे “बीट कॉइन’ आणि “इथर’ हे आभासी चलन जप्त करण्यात आले होते. या गुन्हयाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी दोघा तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली होती. मात्र दोघाही तांत्रिक तज्ज्ञांनी पोलिसांची दिशाभूल करत करोडो रुपये मूल्य असलेली क्रिप्टो करन्सी स्वत:च्या व इतर अन्य साथीदारांच्या वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतली. या प्रकरणी दोघाही तज्ज्ञांना पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली
आहे. यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (आर्थिक व गुन्हे) यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड, पुणे) आणि रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रवींद्र पाटील हा 2004 च्या बॅचचा आयपीएस अधिकारी असून त्याने स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत 2018 मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने बऱ्याच जणांना फसविणाऱ्या आरोपींविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाणे आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद झाले होते.
त्याच्या तपासामध्ये अटक आरोपींकडून तांत्रिक पुरावे गोळा करणे आणि क्रिप्टो करन्सीसंबंधी गुन्ह्यातील मालमत्ता जप्त करणेसाठी या व्यवहारांमध्ये तांत्रिक तज्ज्ञांची मदत तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यामध्ये ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशनचे पंकज प्रकाश घोडे व के. पी. एम. जीचे रवींद्र प्रभाकर पाटील यांचा समावेश होता. मात्र, त्यांनी या गुन्ह्यांतील अटक आरोपींकडून क्रिप्टो करन्सी जप्त करताना संशयास्पद भूमिका निभावल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) यांनी दिले. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्तांकडून करण्यात आली. या तपासा दरम्यान एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून तांत्रिक तज्ज्ञ रवींद्र पाटील आणि पंकज घोडे यांनी काही क्रिप्टो करन्सी (241.47858055 बिट कॉईन कॅश, 94.254124 इथर) जप्त केली होती. हे करीत असताना तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना जप्त तांत्रिक डाटा विश्वासने त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे पाटील आणि घोडे यांनी तपास अधिकाऱ्यांनी विश्वासाने सुपूर्द केलेल्या तांत्रिक डेटाचा गैरवापर करून जप्त केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधून क्रीप्टो करन्सी स्वतःच्या तसेच त्यांचे अन्य साथिदारांचे विविध क्रिप्टो करन्सी वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतले. तसेच पंकज घोडे याने तपासी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी जप्ती पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटच्या ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट्सचे बनावटीकरण केले व बनावट स्क्रीनशॉटस् खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केले.
आरोपीचे जप्त केलेल्या वॉलेटबाबत खोटी माहिती देऊन गुन्ह्याचे तपासाची दिशाभूल केली असून त्याने आरोपीच्या वॉलेट मधील क्रिप्टो करन्सीमधील पूर्ण बिटकॉईन जप्त न करता काही भाग तसाच ठेवून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत आढळले आहे. त्यांनी गुन्ह्यातील क्रिप्टो करन्सी त्यांचे स्वतःचे व अन्य खात्यांवर वळवून घेतल्याचे त्यांचे के.वाय.सी. वरून स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, उपायुक्त (सायबर व आर्थिक सेल) भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांचे मार्गदर्शनाखाली, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक चिंतामण, मीनल सुपे-पाटील, राजुरकर, खेडकर, कोळी, भोसले, भापकर, नलावडे, सहायक पोलीस निरीक्षक वाळके, उपनिरीक्षक नेमाणे, डफळ, पडवळ व अंमलदार तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेतील तज्ज्ञ अधिकारी तेजस कट्टे, तनुजा सूर्यराव, राहुल कनोज व श्रीमती गायकवाड या पथकाने केले.
तत्कालीन आयपीएस अडचणीत ?
यातील एका आरोपीची पोलीस आयुक्तालयातील एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याबरोबर तपासाच्या कालावधीत उठबस होती. त्यांच्या या “अर्थ’पूर्ण मैत्रीची चर्चा त्यावेळी आयुक्तालयात सर्रास होत होती. आरोपीने बीट कॉइन संबंधित अधिकाऱ्याच्या खात्यातही जमा केल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याकडे किमान 250 कोटी रुपये वळवण्यात आले असल्याची शक्यता व्यक्त होत असून येत्या काही दिवसांत या व्यवहाराचे गौडबंगाल उलगडण्यात यश येईल, असे सूत्रांनी सांगितले.