पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या एमडीआर – 31 रस्त्याचे फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते व खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा रस्ता हिंजवडी आयटी पार्ककडून डांगे चौक मार्गे चिंचवड एमआयडीसी, भोसरी, चिखलीकडे जाणार्या विकास आराखड्यातील 34.5 मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आहे. तसेच हा रस्ता औंध-रावेत या 45 मीटर रुंदीच्या बीआरटीएस रस्त्याला जोडणारा फिडर रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
या रस्त्याचा अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकास करणे गरजेचे आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना याचा फायदा होणार असून रस्त्यावर बसण्यासाठी दगडी आसने, जिम साहित्य तसेच म्युरल, पॅराबोला इ. सुविधा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच रात्री पादचारी मार्गावरील चांगल्या दृश्यमानतेसाठी अत्याधुनिक पथदिवेही बसविण्यात येणार आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपनुसार विकसित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. हा प्रकल्प केवळ सुशोभीकरणासाठी नसून यामुळे वाहतूक सुरळीत होऊन पादचार्यांना, सायकलस्वारांना आणि वाहनचालकांना सुलभतेने आणि सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.