टोकिओ – जपानमध्ये बर्ड फ्लूचे या वर्षातले पहिले प्रकरण सापडले आहे. जपानच्या ईशान्येकडील एका पोल्ट्री फार्ममध्ये या रोगाची लागण झालेल्या कोंबड्या सापडल्या आहेत. सोमवार ते मंगळवार दरम्यान 190 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
काही मृत कोंबड्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली होती, हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशभरातील तब्बल 1 लाख 43 हजार कोंबड्या मारुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुक्कुटपान क्षेत्रातील उद्योगांनी स्वयं सहायता दलाच्या मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.
बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या अथवा अंडी खाण्यामुळे मानवाला काही संसर्ग होऊ शकतो का, हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या दिड लाख कोंबड्या मारुन टाकल्या जाणार आहेत. ज्या भागात ही बर्ड फ्लूची साथ पसरली आहे, त्याच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मवर बंदी घालण्यात आली आहे.