नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश राज्यात बर्ड फ्ल्यू पसरण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यातच आता येथील सिरमोर जिल्ह्यातील पावटामधील भूपपूर तिबेटीयन कॉलनीत डझनभर कावळे मृत अवस्थेत आढळून आले आहे. यामुळे या परिसरात अस्वस्थता पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच डीएफओ पावटा वन विभागाव्यतिरिक्त पशुपालन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या टीमने मृत कावळ्यांचे नमूने घेतले असून पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
यापूर्वी विलासपूरमध्ये एनटीपीसी कोल धरण परिसरातील जमथल गावातील एका नाल्यात 18 ते 20 कावळे मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते. त्या कावळ्यांना जमिनीत पुरूण टाकण्यात आले होते. येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कावळ्यांच्या चोचीतून फेस बाहेर येत होता.
दरम्यान कांगडा येथील पोंग धरणाजवळील भागात मृत अवस्थेत सापडलेल्या पक्षांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळून आला होता. त्यानंतर राज्यात बर्ड फ्ल्यूचा अलर्ट जाहीर करण्यात आला.
दुसरीकडे, कांगडा जिल्ह्यात पौंग धरणाच्या किणाऱ्यावर वसलेल्या नगरोटा सूरिया, खब्बल, सुगनाडा आणि जरोट गावांमध्ये हवेत उडणारे पक्ष मृत होऊन घरांवर पडत आहेत. मृत प्रवासी पक्षांचे सेवन केल्यामुळे हे पक्षी मरत आहेत. तसचे उडतांना ते घरांवर मृत होऊन पडत असल्याचे समजते. पक्षी घरांवर मृत होऊन पडत असल्यास त्याची माहिती जवळच्या पशु रुग्णालयात देण्याची सूचना पालमपूर पशुपालन विभागाचे उपनिदेशक डॉ. संजीव धीमान यांनी दिल्या आहेत.