आता गुगल मॅप्सवरही मराठी भाषा

नव्या अपडेट्‌समध्ये नऊ भारतीय भाषांचा समावेश

श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – विविध शॉपिंग ऍप्ससह डिजिटल माध्यमांतून मराठी भाषेच्या उपलब्धतेची मागणी होत असतानाच गुगलने आपल्या मॅप्स अर्थात नकाशांच्या ऍप्समध्ये मराठी भाषा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांसह, व्यावसायिक वाहनचालकांना (ट्रक-टेम्पो/कार ड्राव्हयर्स) हे ऍप वापरुन रस्ते शोधणे सोपे जाणार आहे. यामुळे कोणीही मागणी केलेली नसताना, गुगलने स्वयंस्फूर्तीने मराठी भाषा उपलब्ध करुन दिल्याने अनेक वापरकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्लेस्टोअरमध्ये काही दिवसांपूर्वी गुगल मॅप्सचे अपडेट आले. त्यामध्ये मराठीसह तेलुगु, गुजराती, कानडी, बांगला, पंजाबी, मल्याळी आणि तमिळ अशा भारतीय भाषांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मराठी ही भारतात बोलली जाणारी तिसरी मोठी भाषा असल्याने आणि लक्षावधी मराठी बांधव गुगल मॅप्सचा मुबलक वापर करत असल्याने मॅप्सच्या ऍपवर मराठी भाषा उपलब्ध असणे गरजेचे होते. गुगलने याबाबत पुढाकार घेत भारतीय भाषांना स्थान दिल्याने अल्पावधीत या लोकोपयोगी ऍप्सची लोकप्रियता वाढण्यास मदत होणार आहे.

शॉपिंगसाठी लोकप्रिय असलेल्या फ्लिपकार्टने नुकतीच त्यांच्या ऍपवर मराठी भाषा उपलब्ध करुन दिली आहे; तर लवकरच ऍमेझॉनवरही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची तयारी दर्शवल्यानंतर तातडीने या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या जाग्या झाल्या आणि मराठी भाषा उपलब्ध करुन दिल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसल्याचे, लक्षात आल्यानंतर त्यांनी ऍपचे सॉफ्टवेअर अपडेट करायला सुरुवात केली.

त्याउलट, गुगल मॅप्सने कसलाही गाजावाजा न करता मराठीसह अन्य आठ भारतीय भाषांचा समावेश करत, एक वेगळाच आदर्श घालून दिल्याने गुगल ऍप्सचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुगल मॅप्सवर कार्यरत असलेल्या लोकल गाईडस कम्युनिटीनेही या सुविधेचे स्वागत केले आहे.

गुगल क्राऊडसोअर्स वापरणारे सदस्य आणि लोकल गाईड्‌स सातत्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर स्थानिक भाषेचा आग्रह धरत होते. असाच आग्रह भारताबाहेरही धरला जात होता. मात्र, याचे राजकीय भांडवल करण्यात आले नव्हते किंवा कोणा राजकीय पक्षाला हा मुद्दाच लक्षात आला नव्हता. मात्र, आता गुगलने नकाशांवर ही स्थानिक भाषेची सुविधा दिल्याने, सर्वांचीच मोठी सोय होणार आहे आणि मॅप्सच्या ऍपची लोकप्रियताही वाढणार आहे.
– श्रुतिका मांजरेकर, गुगल मॅप्स लोकल गाईड, मुंबई

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.