पिंपरी : महापालिका शाळेतील कामचुकार शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र, मागील वर्षभरापासून शाळेमधील सर्व बायोमेट्रिक मशीन बंद पडल्या असून, केवळ शोभेच्या वस्तूच बनलेल्या आहेत. बायोमेट्रिक मशीन बंद असल्यामुळे कामचुकार शिक्षकांची पुन्हा चंगळ सुरू झाली असून, अनेक शिक्षक शाळा सुटण्याओगदरच गायब होत असल्याचे दिसून येत नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका शाळेतील शिक्षकांच्या हजेरीसाठी शिक्षण मंडळाने पाच वर्षांपूर्वी बायोमेट्रिक प्राणाली बसविली. पोलस्टार कन्सल्टिंग प्रा. लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या 130 शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली होती. त्यामुळे, शिक्षकांना बोयोमेट्रिक प्रणालीवरच आपली हजेरी नोंदवावी लागत होती. परंतु, मागील वर्षभरापासून बायोमेट्रिक नादुरुस्त असल्याने या प्रणालीवर शिक्षकांची हजेरी नोंदविण्याचे बंद केले आहे. बायोमेट्रिक प्रणालीवर शिक्षकांची अनुपस्थिती, कर्मचारी नोंदणी, वेळ चुकीची दाखविणे, बॅटरी खराब आणि उशिरा येत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. तपासणीअंती हे मशीन वापरणे बंद केले होते. मागील वर्षभरापासून या मशीन दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. संबंधित कंत्राटदाराने काम सोडल्याने त्याची दुरुस्ती झाली नाही. मशीन त्वरित दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाने चार वेळा संगणक विभागास कळविले आहे, तरीही या विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
बायोमेट्रिक मशीन बंद असल्याचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे. शाळेतील कामचुकार शिक्षक बऱ्याचदा वेळेपूर्वीच निघून जात असल्याचे दिसत असून, बायोमेट्रिक मशीन त्वरित दुरुस्त करावी जेणे करून शिक्षकांना शिस्त लागेल, अशी मागणी पालकांमधून होत आहे.