पिंपरी – या उद्योगनगरीत सर्वसामान्य व्यक्तीस व्यवसाय करण्यासाठी एखादे दुकान किंवा गाळा भाड्याने मिळविण्यासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात. परंतु महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारती अनेक वर्षे अक्षरश: धूळ खात पडून अथवा बळकावलेल्या आहेत. त्यातील पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, सांगवी, निगडी, भोसरी, थेरगाव या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधलेले विविध प्रकारचे 90 व्यापारी गाळे आजही अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. तर 80 गाळे वापरण्यासाठी योग्यच नसल्याचे समोर आले आहे. गाळे भाड्याने देण्यासाठी महापालिकेचा भूमी जिंदगी विभाग सातत्याने प्रयत्न करत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
शहरात महापालिकेचे 920 व्यापारी गाळे आहेत. यामधील 177 गाळांचा महापालिका वापर करते तर 373 गाळे भाडेपट्याने दिले असून 197 गाळे भाड्याने दिले आहेत. यामध्ये नियमाप्रमाणे महिलांना 117 गाळे वितरित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत 90 गाळे रिक्त असून 32 गाळ्यांसाठी नागरिकांचे अर्ज आले आहेत. तर 80 गाळे वापरण्यासाठी योग्यच नाहीत.
मंडई, मार्केट निरुपयोगी
भोसरी, गव्हाणेवस्ती येथे लाखो रुपयांचा निधी खर्च करून नव्याने उभारण्यात आलेली संत ज्ञानेश्वर भाजी मंडई एक वर्षांपासून वापराविना पडून आहे. यामधील फक्त 8 गाळे वितरित करण्यात आले असून 71 गाळे धूळखात पडून आहेत. शहरातील मांसाहारी नागरिकांची दखल घेऊन बांधलेल्या मटन आणि मच्छी मार्केटच्या आठपैकी फक्त पिंपरीचे मार्केट सुरू आहे. दुसरीकडे ती सोय असूनही चिंचवड, थेरगाव, नेहरूनगर, भोसरी, काळेवाडी येथे रस्त्यालगत मासळी बाजार भरतो. तर, महापालिकेने बांधलेल्या 15 मंडई पैकी सध्या 7 सुरु असून 8 ओसाड पडून आहेत. प्रकल्पांचे खर्च अवास्तव आणि त्याचे मूल्यांकनानुसार होणारे भाडे अवाच्या सवा आल्याने महापालिकेच्या इमारती, गाळे पडून राहिल्या आहेत. जे गाळे वाटप झाले आहेत त्याचे भाडे देखील वसूल होत नाही अशी परिस्थिती आहे.
सिंगापूर स्टाइल मंडईतील
125 गाळ्यांच्या वितरणासाठी 15 वर्षे
पिंपरी महापालिकेने संत तुकारामनगर येथे सिंगापूर स्टाईल गोल भाजी मंडईचे तीन मजली इमारत बांधली. मात्र फक्त सव्वाशे गाळ्यांचे वितरण तब्बल पंधरा वर्षे सुरू होते. या योजनेला बिल्कुल प्रतिसाद नव्हता. आकुर्डी येथे कै. संजय काळे व्यापार संकुलाची तीच गत झाली. दोन कोटी रुपये खर्च करून 1998 मध्ये हे संकुल उभारले. जागा चुकीची असल्याने पाच वर्षे कोणीही ढुंकून पाहत नव्हते. तिथे पतसंस्था, बचतगट व नगरसेवकांच्या हितसंबंधितांना गाळे वाटप झाले. उर्वरित जागेत महापालिका न्यायालय सुरू केले. मुंबई-पुणे महामार्गालगत निगडीच्या मुख्य चौकात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी चार कोटी रुपये खर्च करून संत तुकाराम व्यापार संकुलाची इमारत साकारली. या प्रकल्पातील प्रशस्त कलादालनाची देखणी इमारत तशी शहराच्या सौंदर्यात भर घालणारी परंतु परवडत नसल्याने कलादालन केवळ नावालाच राहिले. त्यांनतर येथे स्मार्ट सिटीचे कार्यालय सुरू करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका भूमी व जिंदगी विभागाच्या ताब्यात असलेल्या गाळ्यांचे वितरण करण्यासाठी लिलाव प्रक्रिया सातत्याने सुरु असते. तात्पुरते, भाडेकराराने, लिलाव पद्धतीने गाळ्यांचे वितरण केले जाते. नुकतेच काही गाळ्यांचे जाहीर निवेदन प्रसिध्द करण्यात आले असून यासाठी 460 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 80 गाळे हे वापरण्यास योग्यच नाहीत.
– प्रशांत जोशी, सहाय्यक आयुक्त भूमी व जिंदगी विभाग