विनय गजानन खरे भारतीय समृद्ध वारसा जगापुढे अधिक स्पष्ट स्वरूपात आणायचा असेल, तर संग्रहालय डिजिटल होण्यासाठी जगभरात भर दिला जात आहे, तोच कित्ता देशातील संग्रहालयांना गिरवावा लागणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार पावलं टाकत आहे. देशाची सांस्कृतिक परंपरा, मोहेंजो दरो वारसा, सांस्कृतिक आणि सामाजिक रितीरिवाज, कलाकौशल्ये, शिल्पकला असा मोठा समृद्ध ठेवा संग्रहालयांच्या माध्यमातून जपला जात आहे. याची जगात आणखी जास्त ओळख करून देण्यासाठी वारसा जतन, प्रचार आणि चिरस्थायी बनवण्याची गरज आहे. यावर अधिक जोर देण्यासाठी नुकतीच जागतिक शिखर परिषद दिल्लीत पार पडली. याद्वारे अधिकचे आंतरराष्ट्रीय पर्यटन तर होईलच शिवाय आर्थिक परिस्थिती बदलली जाऊ शकते. रोजगार वाढ आणि अनुषंगिक बाबीला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विकास आणि वारसा’ असा मंत्र नुकताच दिला आहे. आपल्या अद्भुत वारसा जपणुकीबरोबरच स्थानिक गरिबांना विकासाचे फायदे मिळून पर्यटकांना परंपरा आणि इतिहास दर्शन होईल. देशातील नागरिकदेखील यादृष्टीने अद्यापही काहीसे अनभिज्ञ आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत आणि येथील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि तो चिरायू करण्याकडे नव्याने समर्पित वृत्तीने लक्ष देत आहोत याचा अभिमान वाटतो, असे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले होते. आपल्या गौरवशाली भूतकाळाला पुन्हा जिवंत करण्यात ही संग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावतील. सध्या देशात हजारांहून अधिक संग्रहालये असून सांस्कृतिक वारशाचे जतनच नव्हे तर भावी पिढीला शिक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. देशातील संग्रहालयांना प्रोत्साहन आणि अद्ययावत बनवण्यात अन्य विभाग आणि मंत्रालयांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची ओळख करून देण्यासाठी भारत सरकारने 10 संग्रहालये विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. वस्त्रोद्योग आणि हस्तकला संग्रहालये, संरक्षण संग्रहालये, रेल्वे संग्रहालय आदी सारख्या विशेष संग्रहालयांना सहाय्य केले जात आहे. संग्रहालये ही सर्वात विश्वासार्ह संस्थांपैकी एक आहेत. समावेशकता, विविधता आणि वैज्ञानिक माहितीचा प्रसार करण्याचे संग्रहालये अद्भुत साधन आहे. आपल्या देशातून परदेशात गेलेल्या किंवा नेलेल्या प्राचीन वस्तू मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानुसार चोरीला गेलेल्या किंवा हिरावून नेलेल्या अनेक प्राचीन वस्तू परत आणण्यात आल्या आहेत. 1976 पासून परत आणलेल्या 212 पुरातन वस्तूंपैकी 199 वस्तू मागील काही वर्षांत भारतात आणल्या गेल्या आहेत. यापैकी 157 प्राचीन वस्तू नुकत्याच अमेरिकेतून आणण्यात आल्या आहेत. यातून पुन्हा एकदा विकास आणि वारशाप्रती सरकारची वचनबद्धता दिसून येते. सध्या जगभरात अनेक शहरांमधून मोठी आणि जास्त संख्येने म्युझियम आहेत. सर्वाधिक म्हणजे दोनशेच्या जवळपास लंडनमध्ये, तर मॅक्सिकोमध्ये 170 संग्रहालये आहेत. सांस्कृतिक, मेट्रोपोलिटीन कॅथेड्रल ते फाइन आर्टस अशी नाना तऱ्हेची संग्रहालये येथे पाहण्यास मिळतात.स्थानिक स्थापत्य शैलीतील इमारतीही संग्रहालयात रूपांतरित आहेत. आपल्या देशातही अनेक नावाजलेली संग्रहालये आहेत. येथे लोकांची अलोट गर्दी असते. त्यापैकी मुंबईत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे महत्त्वाचे आहे. मुंबईत येणारा पर्यटक गेट वे ऑफ इंडिया आणि येथे आवर्जून जातो. जवळच रिझर्व्ह बॅंकेचे नाणे संग्रहालय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, भायखळा भागात डॉ. भाऊ दाजी लाड, चर्चगेट-सीएसटीएमचे रेल्वे संग्रहालय यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मध्य प्रदेशात नवीन भोपाळजवळ अनुसूचित जाती-जमातीचे संग्रहालय आणि शौर्य स्मारक महत्त्वाचे आहे. नागपुरात देखील झिरो माइल्स नजीक शासकीय संग्रहालय आहे. हिमाचल प्रदेशात सिरमोर येथील शिवालिक फोस्सील पार्क हे आशिया खंडातील सर्वांत मोठे आहे. रेजिन आणि फायबर ग्लास प्रकारातील ममल्स आणि इतर प्राणी येथे पाहण्यास मिळतात. कोलकाता इंडियन म्युझियम, लोथलचे आर्कियोलॉजिकल तसेच पतंगासाठी पालडी, वस्त्रोद्योग क्षेत्राचे कॅलिको संग्रहालय, लैंगिक शिक्षणाचे मुंबईतील तावरी पाडा लालबाग अंतरंग म्युझियम, आंध्र प्रदेश आयर्लंड म्युझियम नागार्जुन कोंडा, गोवा वास्कोचे नेव्हल एव्हीएशन, पद्दुचेरीचे जवाहर टॉय म्युझियम, बे वॉच वॅक्स म्युझियम कन्याकुमारी,आसाममधील ब्लॅक मॅजिक- विचक्राफ्ट, बंगळुरूतील मनुष्य मेंदू संग्रहालय, हैदराबादचे सालारजंग, चंदीगड आर्ट गॅलरी, बिहार-पाटणा संग्रहालय, तिबेटीयन वर्क्स अँड आरकाईव्ह धर्मशाळा हिमाचल प्रदेश, विशाखापट्टणमचे सब मरीन पाणबुडी संग्रहालय हे भारतातील आणखी काही महत्त्वाची संग्रहालये आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाचनप्रेमींसाठी देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारण्यात येणार आहे. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाच्या (बालभारती) बैठकीत यासाठी येत्या आर्थिक वर्षासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बालभारती ग्रंथालयात 1837 पासून दुर्मिळ अशी पाठ्यपुस्तके जपून ठेवली आहेत. देशाच्या अन्य राज्यातील पाठ्यपुस्तकेही एकत्र करण्यात येतील. याद्वारे पाठ्यपुस्तकांचा उद्देश, रचना, वैशिष्ट्ये, स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास करता येणे शक्य होईल.