समस्तीपूर (बिहार) – अनेकदा आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात ज्यांमुळे आपला माणुसकीवरील विश्वासच उडून जातो. अशीच एक मनाला चीड आणणारी घटना बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. येथे एका बापावर आपल्या पोटच्या पोराचा मृतदेह घरी आणता यावा यासाठी भीक मागायाची वेळ आली आहे. पोराच्या अकाली जाण्याने आधीच खचून गेलेल्या या बापाला त्याचा मृतदेह घरी आणण्यासाठी ५० हजारांची लाच मागण्यात आली. पोराचा मृतदेह घरी आणता यावा, अंतिम संस्कार करता यावे यासाठी हा माणूस दारोदारी जाऊन हात पसरत आहे.
याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, समस्तीपूर जिल्हा रुग्णालयामध्ये या इसमाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र खिशात दीड दमडी नसल्याने या व्यक्तीवर भीक मागण्याची वेळ आली आहे.
हा व्यक्ती दारोदारी जाऊन भीक मागत असतानाच एक व्हिडीओ समोर आल्यानंतर आता देशभरातून दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. एका नामांकित वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असलेले बहुतांश आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगार वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत हे कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळायला बघतात.
प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर या प्रकारणामधे दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची मलमपट्टी जिल्हा शैल्य चिकिस्तकांनी केली. या प्राकारणामुळे बिहारमधील आरोग्य व्यवस्था आज देखील राम भरोसेच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.