पाटणा -बिहार क्रिकेट संघटनेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांकडून दोन वेगवेगळे संघ जाहीर करण्यात येणार असल्याचे वर्तवले जात होते. त्यातील एका नेत्याने आपला 19 वर्षांखालील संघ तयार करून तो बीसीसीआयकडे पाठवलाही आहे. हे दोन्ही नेते आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचे सांगत असून त्यांच्या या भूमिकेवर बीसीसीआयने संताप व्यक्त केला असून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
19 वर्षांखालील विनू मांकड करंडक स्पर्धेसाठी भाजपच्या दोन नेत्यांनी आपापले संघ जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही नेते आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. बीसीसीआयने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून सचिव जय शाह यांनी हे सगळे थांबवा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
बिहार भाजपचे माजी खजिनदार तसेच बिहार क्रिकेट संघटनेचे (बीसीए) अध्यक्ष राकेश तिवारी यांनी 135 युवा खेळाडूंची संभाव्य चाचणी शिबिरातून निवड केली असून येत्या 14 सप्टेंबर रोजी संघाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे. तर, दुसरीकडे माजी आमदार आणि बिहार भाजपचे प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी 19 वर्षांखालील खेळाडूंचा संघ तयार करत त्याची यादी बीसीसीआयला पाठवलीदेखील आहे.
बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीला राकेश तिवारी उपस्थित होते व तेच स्वतःला संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. तर, दुसरीकडे प्रेम रंजन पटेलही आपणच अध्यक्ष असल्याचे सांगत असून त्यांनीही एक अन्य संघ तयार करत त्याची घोषणाही केली आहे.