मुंबई – अभिनेत्री सुंबूल तौकीर ‘बिग बॉस 16’ च्या शोनंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. या शोमध्ये तिने साध्या सरळ स्वभावामुळे प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र आता सुंबूल एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. सुंबूलचे वडील तौकीर खान यांनी नुकतेच दुसरे लग्न केले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुंबुलच्या वडिलांनी निलोफरसोबत लग्न केलंय. निलोफर या घटस्फोटित असून त्यांना एक मुलगी आहे.
सुंबुलच्या वडिलांचे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी विवाह सोहळा पार पडला. परंतु यासाठी घराला आकर्षक सजावट केल्याचे देखील फोटोमध्ये दिसते. तसेच यावेळी कुटुंब मिळून प्रार्थना करताना दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये सुंबुलने हातावर मेहंदी काढल्याचे देखील दिसते. या लग्न सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सुंबुल तौकीर खानने त्याचे वडील पुन्हा लग्न करणार असल्याची पुष्टी केली होती. अनेक अडचणींनंतर त्यांनी वडिलांना या लग्नासाठी राजी केल्याचे तिने म्हंटले होते.
सुंबुल तौकीर म्हणाली होती की, ‘मी माझ्या वडिलांसाठी खूप आनंदी आहे. मी या दोघांचे माझ्या कुटुंबात स्वागत करते. फक्त आईच नाही तर तिच्यासोबत आम्हाला लहान बहीणही मिळत आहे. आम्ही सर्व उत्सुक आहोत. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मी आणि माझी धाकटी बहीण पप्पांसाठी खूप आनंदी आहोत.’
दरम्यान, सुंबुल सहा वर्षांची असताना तिच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. सुंबूलचे वडील तौकीर हसन खान यांनी दोन्ही मुलींचं संगोपन केलं आणि करिअरमध्ये पाठिंबा दिला. बिग बॉसच्या घरात देखील तौकीर यांनी एंट्री घेतली. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते विशेष चर्चेत आले होते.