आमदार योगेश टिळेकर यांना विजयी होण्याचा विश्वास
हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश(आण्णा) टिळेकर यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात काढलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचा मोठा सहभाग होता. जोरदार पावसात शक्तिप्रदर्शन करत आमदार टिळेकर यांनी प्रचाराची सांगता केली. नागरिकांचा प्रतिसाद पाहता आमदार योगेश टिळेकर यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा आहे.
आमदार टिळेकर म्हणाले, “आम्ही केलेल्या समाजकार्याची जाण ठेऊनच मतदारसंघातील जनतेने भरपावसात या रॅलीत सहभागी होऊन हे दाखवून दिले आहे, की कोणी काहीही करो विजय हा सत्याचाच असतो. विकासासाठी येथील जनता आपल्याच पाठीशी पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. आता विकास करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे येत्या 21 तारखेला “कमळ’ चिन्हापुढील बटन दाबून महायुतीला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन टिळेकर यांनी केले.
प्रचार सांगता रॅलीला सर्व धर्मीय नागरिक, सामाजिक संस्था-संघटना, मंडळांचे कार्यकर्ते, तरुण आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. सर्व मतदारसंघ घोषणाबाजी, झेंडे व पताक्यांमुळे परिसर भाजपमय झाला होता. ही रॅली कात्रज येथून सुरू झाली. पुढे कात्रज-सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, एनआयबीएम, कृष्णानगर, महंमदवाडी, सातवनगर, काळेपडळ, सय्यदनगर, ससाणेनगर, हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, महादेवनगर, मांजरी,केशवनगर, मुंढवा, साडेसतरानळी, घोरपडी, भिमनगर, मगरपट्टा, रामटेकडी, वैदुवाडी भागातून पुढे गेली.