बिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित राहणार
पुणे – करोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाउन काळात बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
लॉकडाउन काळातील वीजबिलातील स्थिर आकार-मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल.
मे 2020 मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.
लॉकडाउनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून या काळातील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर – पीएफ सारखे सर्व सवलती उपलब्ध असतील. मार्च 2020 महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक 15 मे असणार आहे. तर एप्रिल- महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक 31 मे-राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.
…तर सरासरी बिल भरावे लागणार
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून ग्राहकांना वेबसाइट किंवा मोबाइल ऍपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे, त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्याचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.