ऑटो रिक्षांची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

दररोजची 50 लाखांची उलाढाल ठप्प; रिक्षाचालकांवर आली उपासमारीची वेळ

नगर  (प्रतिनिधी) – करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 23 दिवसांपासून संचारबंदी आहे. या काळात रेल्वे, बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशी नाहीत. त्यामुळे ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. शहरात पाच ते सहा हजारांवर परवानाधारक व विनापरवानगा ऑटोरिक्षा आहेत.सध्या शहरातील रस्त्यांवर एकही ऑटोरिक्षा धावत नसल्याने, ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

रिक्षाची चाके थांबल्याने दररोजची तब्बल 50 लाखाची उलाढाल ठप्प झाली आहे. करोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे.शासनाने 22 मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे रेल्वे, बससेवासुद्धा बंद आहे. गर्दीमुळे करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, या दृष्टिकोनातून रेल्वे व परिवहन विभागाला सेवा बंद ठेवाव्या लागत आहेत.रेल्वे स्थानक, बसस्थानकावर प्रवासी नसल्यामुळे आणि नागरिकांचे बाहेर पडणे बंद असल्याने, ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत.

 एक ऑटोरिक्षा चालकाला दररोज 500 ते 800 रुपये रोजगार मिळायचा. यातून मुलांचे शिक्षण, घरखर्च भागायचा; परंतु आता हा रोजगारच बुडाला असल्याने आणि उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, याची चिंता ऑटोरिक्षा चालकांना सतावत आहे.

करोनामुळे ऑटोरिक्षा चालकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या 23 दिवसांपासून घरांसमोर ऑटोरिक्षा उभ्या आहेत. घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी आबाळ होत आहे. अशा संकटकाळात करावे काय, असा प्रश्न ऑटोरिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ऑटोरिक्षा चालकांनी केली आहे.

शाळा बंद, तर ऑटो बंद!

शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे एक हजारच्यावर ऑटोरिक्षा चालक आहेत; परंतु शाळा, महाविद्यालयांना अचानक सुट्या देण्यात आल्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांसमोरसुद्धा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिन्याकाठी 8 ते 10 हजार रुपये येणारा रोजगार बंद झाला आहे. करोनाच्या संचारबंदीमुळे ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

चालकांकडून आता भाजीविक्री

प्रवासी नसल्याने आता काही रिक्षाचालकांनी अक्षरश: भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. रिक्षामध्ये भाजीपाला घेवून घरोघरी हे चालक भाजी विक्री करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.