नगर (प्रतिनिधी) – करोनाच्या या महामारीत बॅंकीग व्यवहारांत ऑनलाईन पद्धतीने गंडविणाऱ्यांना धोक अधीक वाढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बॅंकीग व्यवहार करणाऱ्यांनी अतिशय सावधपणे व्यवहार करावेत, असे आवाहन अहमदनगर मर्चंट्स बॅंकेच माजी अध्यक्ष तथा सीए अजय मुथ्था यांनी केले आहे.
“करोना’सारख्या संकटाचा फायदा घेण्यासाठी सायबर हॅकर्सही जगभरात सक्रिय झाले आहेत. अमेरिकेतील अर्थविषयक वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार मागील महिन्यात करोना, कोविड वगैरे संलग्नित अशी नावं असलेल्या जवळपास एक लाख डोमेन नावांची नोंदणी झाली आहे. त्यातून सायबर हल्ले, देणगीच्या नावाने बनावट खाते तयार करून पैसे लाटण्याचे उद्योग वाढले.
अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी डिजीटल बॅंकिंगचे व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ई-मेल, व्हॉटसअप, मोबाईलवर आलेल्या मेसेजची अथवा लिंकची पूर्ण खात्री करूनच त्याला प्रतिसाद द्यावा. शक्यतो अनोळखी नंबर अथवा यंत्रणेकडून आलेल्या मेसेजकडे दुर्लक्षच करावे अथवा त्याबाबत सायबर सिक्युरिटी यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन सीए मुथा यांनी केले आहे.
करोनाच्या या काळात अशा अपप्रवृत्तींना कोणताही प्रतिसाद न देणे हाच या फसवणुकीपासून वाचण्याचा योग्य मार्ग आहे. मोबाईलवर ओटीपी, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती मागणारे कॉल्स अथवा एसएमएस आल्यास सध्या तरी त्यांना उत्तरच देऊ नये. त्यातही काही अडचण असल्यास थेट आपल्या बॅंकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.
केंद्र व राज्य सरकारांनी आर्थिक मदतीसाठी अकाऊंट्स नंबर जाहीर केले आहेत. त्याच्याशी साधर्म्य असलेले बनावट अकाउंटही तयार केले जाण्याची शक्यता या काळात अधिक आहे. त्यामुळे आपली मदत योग्य खात्यात जमा होते की नाही याचीही काळजी घ्यावी. भारतात आयकर विभागानेही आयकरदात्यांना आपल्या ई-फायलिंग खात्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या खात्याचा विनापरवाना वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार करावी. आर्थिक संस्थांनीही आपली डेटा सिक्युरिटी अपडेट ठेवून ऑनलाईन व्हायरसपासून बचाव करण्याची गरज आहे.
सध्याच्या काळात सर्वच आर्थिक संस्था, बॅंकांसमोर सायबर सुरक्षेची अतिरिक्त काळजी घेण्याचे आव्हान आहे. यासाठी डिजिटल बॅंकिंग, क्लस्टर बॅंकिंग, ऑनलाईन चॅटबोटस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.), ब्लॉकचेन अशा साधनांचा सुरक्षित वापर करणे अनिवार्य झालेले आहे. लॉकडाऊनच्या काळात कॅश व्यवहार करण्याऐवजी नागरिकांनी आपापल्या बॅंकांनी दिलेल्या ऑनलाईन सुविधांचा सुरक्षेची काळजी घेवून घरी बसूनच अधिक वापर करण्यावर भर द्यावा. त्याचवेळी आपले इंटरनेट बॅंकिंग तसेच इतर सर्वच महत्त्वाच्या अकाउंटचे पासवर्ड ठराविक कालावधीनंतर बदलत राहणे गरजेचे असल्याचे मुथ्था म्हणाले.
अहमदनगर मर्चंटस् को ऑप.बॅंकेने इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल ऍप, एटीएमसारख्या सुविधा दिलेल्या आहेत. त्याचा वापर करून फंड ट्रान्सफर, आरटीजीएस, एनईएफटीने व्यवहार करता येवू शकतात. याशिवाय ई स्टेटमेंटही ईमेलवर मिळण्याची व्यवस्था आहे.