कंदहार : अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबानने अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली.
Rockets hit Kandahar airport in Afghanistan, airport official: AFP pic.twitter.com/sRtxK5Rm0t
— ANI (@ANI) August 1, 2021
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.
कंदहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने रॉकेट हल्ला झाल्याचे वृत्त दिले आहे. या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची तिथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे.
तालिबानने उत्तर अफगाणिस्तान या त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात जम बसवला असून तेथे वांशिक अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. अनेक कुटुंबे पलायन करीत असून भीतीयुक्त जीवन जगत आहेत. गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने म्हटले आहे.