शाहीद कपूरच्या “कबीर सिंग’मध्ये झळकल्यानंतर कियारा आडवाणीचा भाव चांगलाच वधारला आहे. बॉलीवूडमधील तिची डिमांड चांगलीच वाढली आहे. तिला हिंदीपाठोपाठ आता दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही चांगले रोल मिळायला सुरुवात झाली आहे.
दक्षिण भारतातील रामचरण यांच्या आगामी ऍक्शनपटामध्ये तिची निवड झाली आहे, असे समजले आहे. या सिनेमाचे डायरेक्टर एस. शंकर यांच्याशी कियारा आडवाणीशी अलीकडेच भेट झाली होती. “आरसी-15′ असे या सिनेमाचे नाव आहे, असे समजते आहे.
या सिनेमाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू केले जाणार आहे. यापूर्वी या सिनेमाचे शूटिंग जुलैमध्येच सुरू होणार होते. मात्र, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रामचरण यांच्या “आरआरआर’चे शूटिंग रखडले होते.
त्यामुळेच “आरसी-15’चे शूटिंगदेखील पुढे ढकलावे लागले होते. हा सिनेमा पॅन इंडिया बॅनरखाली तयार केला जाणार आहे. कियाराने यापूर्वीही दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये तिचा पहिला तेलगू सिनेमा “भारत अने नेनू’ रिलीज झाला होता. तर पुढच्याच वर्षी कियाराचा “ताल’ हा तेलगू सिनेमा रिलीज झाला होता.