पुणे : पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत थरारक घटना घडल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
कुख्यात गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणीदेखील केली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असे म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचे कुटुंब घटनास्थळी हजर होते.
गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.