लखनऊ – चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आझम खान यांना न्यायालयाने आज 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 2019 साली केलेल्या एका भाषणाबाबत ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2019साली त्यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरच न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवलं आणि त्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. जामीनासाठी एक महिन्याचा वेळ खान यांच्याकडे आहे.
न्यायालयाने सुमारे दीड तास दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर हा निर्णय दिला आहे. आझम खानच्या वकिलांनी शिक्षा कमीत कमी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याचवेळी खान यांना नियमानुसार मोठी शिक्षा व्हावी, असा प्रयत्न फिर्यादी पक्षाने केला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आझम खान उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
दरम्यान, 27 जुलै 2019 रोजी केलेल्या एका भाषणात आजम खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि तत्कालीन जिल्हाधीकारी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर आकाश सक्सेना यांनी खान यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप करण्यात आला होता. 3 वर्षांनंतर आज याच प्रकरणातील सुनावणीनंतर आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली आहे.