पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. सुपे यांच्या निलंबनाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सुपे यांनी “टीईटी’ परीक्षेत उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
त्यांच्याकडे कोट्यबधी रुपयांचे घबाडही सापडले आहे. सुपे यांच्यावर पुणे पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला असून गुरुवारी (दि.16) अटकही करण्यात आलेली आहे. अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी पोलिस कस्टडी झाली आहे. अद्यापही ते पोलिस कस्टडीतच आहेत. अटकेच्या दिनाकांपासून पुढील आदेश होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टी.वा.करपते यांनी आदेश जारी केले आहेत. निलंबित कालावधीत सुपे यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. अन्यथा गैरवर्तणूकीबाबत दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात ते निर्वाह भत्त्यावरील आपला हक्क गमावून बसतील, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.