नवी दिल्ली – चीनमधील भारताचे राजदूत म्हणून प्रदीप कुमार रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय परदेश प्रशासकीय सेवेतील 1990 च्या तुकडीतील अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलॅन्डमध्ये भारतीय वाणिज्य दूत म्हणून कार्यरत आहेत.
रावत यांना चीनच्या राजदूतपदाचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. ते लवकरच या पदाची सूत्रे स्विकारतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून विक्रम मिस्री हे सध्या नियुक्त आहेत. प्रदीप कुमार रावत हे मिस्री यांची जागा घेतील. पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती असताना रावत यांच्याकडे चीनच्या राजदूतपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रावत यांनी यापूर्वी हॉंगकॉंग आणि बीजिंग येथेही काम केले आहे. रावत यांनी यापूर्वी सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2020 पर्यंत इंडोनेशिया आणि तिमूर लेस्टे येथे भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.