नवी दिल्ली – अमेरिकन डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकन कर्ज रोख्यांवरील परतावाही कमी झाला आहे. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीचे दर साडेचार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 527 रुपयांनी वाढून 48,589 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,043 रुपयांनी वाढून 71,775 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,908 डॉलर तर चांदीचा दर 28.70 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वाढली आहे.
अँजेल ब्रोकिंगचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की क्रिप्टो करन्सीचे कमी झालेले दर आणि चीनकडून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याचे दर सध्या वाढत आहेत.