Zeeshan Siddique। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय.
काँग्रेसकडून मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केलेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आलेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
बाबा सिद्दिकींच्या प्रवेशानंतर पक्षनेतृत्वाचा निर्णय Zeeshan Siddique।
काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान हेदेखील काँग्रेस सोडतील, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर झिशान सिद्दीकी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी एक मुख्यमंत्री असे होते की, माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. असा झिशानने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
पुढे मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो. एकदा तर जाहीर भाषणातही मी त्यांना मलाही मतदारसंघातील कार्यक्रमांचे निमंत्रण देत जा, असे सांगितले होते. अनेकदा माझ्या वाट्याचा निधीही शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिला जात असे. मी त्यावेळी आवाज उठवायचो पण काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मला साथ द्यायचे नाही. मात्र, त्यावेळी अर्थमंत्री असलेले अजित पवार मला मदत करायचे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.