नवी दिल्ली – भारतात अलिकडेच दिल्लीत झालेल्या जी- 20 (G 20) राष्ट्रांच्या परिषदेत भारत- मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉरची घोषणा झाली होती. हा महत्वाकांक्षी प्रकल्प हेही इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील संघर्षाचे एक कारण असू शकते अशी शंका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (joe Biden ) यांनी बोलून दाखवली आहे. मात्र हे आपले केवळ अनुमान आहे. ते सिध्द करण्यासाठी माझ्याकडे कोणता पुरावा नाही असेही बायडेन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ जमीनीसाठीचा अथवा धर्माच्या आधारावर नसून त्याला इतरही अनेक कंगोरे आहेत किंवा असू शकतात असे मानण्यास वाव आहे.
इस्त्रायल (Israel war) आणि हमास यांच्यात गेल्या 20 दिवसांपासून संघर्ष सुरू असून त्या भागात प्रचंड तणाव आणि अशांतता निर्माण झाली आहे. हमास कायमच इस्त्रायलच्या विरोधात संघर्षाच्या पवित्र्यात असते आणि इस्त्रायलही कथित पॅलेस्टीनींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असते हे जगजाहीर आहे. यावेळी सर्वकाही शांत असताना अचानक हमासने आपण इस्त्रायलच्या पासंगालाही पुरणार नाही याची पूर्ण कल्पना असताना इस्त्रायलवर हल्ला केला आणि इस्त्रायलसोबतच संपूर्ण जगाला चकित केले. त्यांनी ज्या ताकदीचा हल्ला केला, तोही इस्त्रायची अभेद्य सुरक्षा यंत्रणा मोडीत काढून केला त्यामुळे सगळेच हबकले. त्यामुळे हे नेमके का आणि कसे झाले याची चर्चा सुरू आहेच. तथापि, आता अमेरिकेच्या अध्यक्षांनीच वेगळी शंका वर्तवल्यामुळे हे प्रकरण दिसते तेवढे मर्यादीत नसून त्याची व्याप्ती खूप मोठी असू शकते याची कुणकुण लागली आहे.
बायडेन यांचे म्हणणे
अलिडकेच दिल्लीत भारत- मिडल ईस्ट (India middle east) कॉरिडॉरची घोषणा झाली होती. तेही या संघर्षाचे कारण असू शकते असे बायडेन यांना वाटते आहे आणि त्यांनी ती शक्यता बोलूनही दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर बायडेन यांनी ही शक्यता बोलून दाखवली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्या अंतर्गत हा संपूर्ण भूभाग रेल्वे मार्गाने जोडण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
काय आहे कॉरिडॉर?
दिल्लीत झालेल्या परिषदेत भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपीय संघाने भारत- मिडल ईस्ट कॉरिडॉरसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. हा कॉरिडॉर आशियासाठी अत्यंत महत्वाचा असेल असे त्यावेळी इस्त्रायलने म्हटले होते. अर्थात कॉरिडॉरमध्ये इस्त्रायल सक्रिय सदस्य म्हणून सहभागी झालेला नाही.
मुंबई (mumbai) येथून सुरू होणारा हा कॉरिडॉर चीनच्या अत्यंत महत्वाकांक्षी बेल्ट आणि रोड इनिशिएटीव्ह अर्थात बीआरआयला पर्याय असल्याचे मानले जाते. सदर कॉरिडॉर 6 हजार किमी लांबीचा असून त्यात 3500 किमी सागरी मार्गाचाही समावेश असणार आहे. कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर भारतापासून युरोपला जी सामग्री पाठवली जाणार आहे त्यात वेळेची 40 टक्के बचत होणार आहे. भारतातून कोणते मालवाहू जहाज आता जर्मनीला पोहोचायला 36 दिवस लागतात. कॉरिडॉर झाल्यावर 14 दिवसांची बचत होणार आहे. थेट युरोपपर्यंत जाण्याचा मार्ग भारतासाठी खुला होणार असल्यामुळे भारतासाठी आयात- निर्यात स्वस्त आणि सोपी होणार आहे.