विजय शिंदे
वडापुरी, -आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाचा आणि उद्घाटनांचा धडाका सुरु केला आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यात कार्यक्रमांची चढाओढ सुरू केली आहे. इंदापूर पंचायत समितीवर कॉग्रेस (हर्षवर्धन पाटील गटाची) पक्षाची सत्ता आहे. तर पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रतापराव पाटील, मधुकर भरणे, हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले, सतीश पांढरे, हनुमंतराव कोकाटे, अतुल झगडे, सचिन सपकाळ यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता पाटील- ठाकरे,भारती दुधाळ, सभापती स्वाती शेंडे, प्रदीपमामा जगदाळे, माजी सभापती करणसिंह घोलप, पुष्पा रेडके, संजय देहाडे, उपसभापती हेमंत नरोटे, देवराज जाधव हे आपल्या गटात व गणात केलेल्या विकासकामांची उद्घाटने करण्यात व्यस्त आहेत.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून बंधारे शाळांचे क्रीडा साहित्य, व्यायाम शाळा व साहित्य, गावांचे जोडरस्ते, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती, शाळा वर्गखोल्या नवीन व दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजना, गटारे, बंधाऱ्यांची दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण आणि क्रॉंक्रीटीकरण आणि सामाजिक सभागृह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून राबविलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा समावेश आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठपुरावा केलेल्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम जोरात सुरू आहेत.
प्रवीण माने यांच्या माध्यमातून निधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रवीण माने यांनी पुणे जिल्हा परिषदेवर बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद भूषवले. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून तालुक्यात आरोग्य रस्ते बांधकाम व वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झाल्याचे दिसून आले; परंतु प्रवीण माने हे राजकारणापासून अलिप्त असल्याचे दिसत आहेत.
कॉंग्रेसचा सभासद नोंदणीस प्रारंभ
कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातूनही राजकीय वातावरण तापवण्यात येत आहे. सर्व जागा स्वबळावर लढण्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तसेच नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात दर्शन घेऊन कॉंग्रेस पक्षानेही सभासद नोंदणीस प्रारंभ केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी परिसरातील गावांना भेटी देत कॉंग्रेस ही सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिवसेनेचाही इच्छुकांसाठी मेळावा
शिवसेनेनेही जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांचा मेळावा गुरुवारी (दि. 10) आयोजित केला आहे. सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी जाहीर केले आहे.