पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महिना, तीन महिन्यांचा पास मिळण्याची सुविधा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले. चिंचवड, कर्जत स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्याबाबत आणि पासची सुविधा सुरू करण्यास खासदार बारणे यांनी राज्यमंत्री दानवे यांना सांगितले. चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर करोनाच्या पहिल्या लाटेपासून रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या दोन स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्याची आवश्यकता आहे. या परिसरातील नागरिक नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात जातात. परंतु चिंचवड आणि कर्जत येथे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली.
रेल्वे गाड्या करोना येण्यापूर्वी ज्या पद्धतीने सुरू होत्या त्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सध्या सुरू आहेत. तसेच आरक्षित तिकिटाबरोबर ऐनवेळी तिकीट काढणाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. एमएमआरडीए क्षेत्रामध्ये सीएसटीएम ते कसारा, कर्जत, खोपोली, सीएसटीएम ते पेन, रोहा, चर्चगेट, ढहाणू या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांनी कर्जतवरील थांबा बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातीलही रेल्वे थांबा बंद केला आहे. दादर-रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचाही थांबा बंद केला. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय
होत आहे.
पूर्वी डेक्कन एक्स्प्रेस चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबत होती. परंतु करोना महामारीमध्ये चिंचवड आणि कर्जत येथील थांबा बंद केला होता. पण सध्या रेल्वे सुरळितपणे सुरू झाली आहे. त्यामुळे चिंचवड आणि कर्जत येथील थांबा पुन्हा सुरू करावा.
18 रेल्वे गाड्यांनी वगळले चिंचवड, कर्जत स्टेशन
दक्षिण भारतातून येणाऱ्या चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्स्प्रेस अशा 18 रेल्वे गाड्यांनी कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे. 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे. पूर्वी इंटरसिटी कर्जत स्थानकावर थांबत होती. पण, आता थांबा बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रेल्वे राज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन समस्या सांगितली. लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना चिंचवड, कर्जत स्थानकांवर थांबा देण्याचे आदेश दिले. तसेच पासची सुविधाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.