राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भोसले यांची हकालपट्टी

आधीच राजीनामा दिल्याचे भोसले यांच्याकडून स्पष्ट

राजगुरूनगर-खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते यांचे विरोधात काम केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस शांताराम यशवंत भोसले यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली. दरम्यान शांताराम भोसले यांनी 7 ऑक्‍टोबर 2019ला वैयक्तिक कारण देत पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांकडे राजीनामा दिला असल्याची माहिती देत राजीनामा पत्र पत्रकारांना दिले आहे.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना पक्षाच्या माध्यमातून पंचायत समितीचे उपसभापती व खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीत भोसले यांनी राहष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचे विरोधात काम केल्याचे निदर्शनास आल्याचा पक्षातील तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी वरिष्ठ कार्यकरिणीकडे तक्रार केली होती. यात भोसले यांनी विरोधी काम केल्याचा अहवाल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनेकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे पाठविला होता. या अहवालावरून जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी त्यांची हकालपट्टी करावी, असे 1 नोव्हेंबर 2019ला लेखी निर्देश तालुकाध्यक्ष यांना दिले. त्यानुसार तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी पत्राद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे सांगितले

  • मी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजेच 7 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीससह सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तो मंजूरही झाला. निवडणुकीत विरोधात काम करण्याचा विषयच येत नाही. केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न तालुका अध्यक्षांकडून केला जात आहे.
    -शांताराम भोसले, माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×