भोर – कासुर्डी (गुं. मावळ, ता. भोर) येथील कातकरी वस्ती येथील दत्तनगर प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या ओसरीवर शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. करोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण तालुक्यात सुरू आहे. मात्र, स्मार्टफोन नसल्याने दत्तनगर येथील विद्यार्थी त्यास अपवाद असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. दत्तनगर येथील शाळेत 21 विद्यार्थी शिक्षण घेत असून, मुख्याध्यापिका सुरेखा मोकाशे आणि रुपाली सरपाले या दोन शिक्षिका आपले कर्तव्य बजावत आहेत.
येथील कातकरी वस्तीतील मुलांच्या पालकांकडे पर्यायाने मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नसल्याने येथील शिक्षकांनी शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमातून जेथे विद्यार्थी भेटतील तेथे ओसरीवरील शिक्षण सुरू केले आहे.
येथील मुलांचे पालक मासेमारी करण्यासाठी भटकंती करीत असल्याने आपल्या मुलांना या कामासाठी बरोबर घेऊन जात असतात. कधी कधी दोन दोन महिने बाहेर गावी ते राहतात, त्यामुळे मुलेही त्यांच्यासोबत असल्याने शिक्षणापासून वंचित राहत असतात. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी येथील शिक्षकांनी मुलांच्या वेळेनुसार त्यांच्या सोयीने ओसरीवर, मंदिरात तसेच जेथे शक्य होईल त्याठिकाणी शिक्षण देणे सुरू केले असून यात शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे बालवाडी किंवा 5 वी, 6 वी च्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण दिले जात आहे.
मुलांना शाळेपर्यंत नेण्याचेही काम सुरू
या शाळेतील दोन्ही शिक्षिका सकाळी एक व दुपारी एक अशा प्रकारे येथील मुलांना शिक्षण देत आहेत. शाळा वस्तीपासून थोडी दूर असल्याने शिक्षक घरी जाऊन त्यांना शाळेत नेतात. हा उपक्रम वंचित मुलांसाठी प्रेरणादायी असल्याने या शिक्षिकांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
“मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेळेत येथील मुलांना त्यांच्या घरी जाऊन, ओसरीवर किंवा जेथे विद्यार्थी त्या ठिकाणी शाळा… असा उपक्रम हाती घेतला आहे. शाळा बंद, शिक्षण चालू या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.”
– सुरेखा मोकाशे, दत्तनगर-कासुर्डी, ता. भोर