नाशिक – नाशिकचे नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढलेला भोंगे मनाई आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भोंग्याबाबत नाशिक शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढून घेण्याबाबत 3 मेपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच, नाशिक शहरातसुद्धा भोंगेप्रकरणी स्फोटक परिस्थिती निर्माण होवू शकते, असे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले होते. याप्रकरणी त्यांनी 17 एप्रिल 2022 रोजी भोंगे मनाई आदेश जारी केला होता. या आदेशाची राज्यभर चर्चा झाली होती.
पोलीस आयुक्त नाईकनवरे म्हणाले, नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वतंत्र भोंगे मनाई आदेशाची आवश्यकता दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यशासनाने ध्वनी प्रदूषणाबाबत परिपत्रकाव्दारे भोंगे वापराबाबत परवानगी, अटी व शर्ती, वेळ आणि आवाजाची मर्यादा याबाबत सविस्तर तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे भोंगे मनाई आदेश रद्द केला जात असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे.