बारामती/ डोर्लेवाडी -कॅन्सरवर उपचार करण्याच्या बहाण्याने बारामतीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनोहरमामा तथा मनोहर भोसले याला शनिवार (दि.11) बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. आपण संत बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले याने कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने 2 लाख 51 हजार रुपये घेतले होते. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर भोसले याने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे आपला आश्रमही उभा केला होता. तेथे एका महिलेची आर्थिक फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही त्याच्यावर नोंदवण्यात आला होता. त्यावरून सोलापूर, पुणे ग्रामीण आणि सातारा पोलिसांनी त्याच्या मागावर होते. त्याला सातारा येथे आलिशान मोटारीतून जात असताना या संयुक्त पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
मनोहर भोसले याने अशा स्वरूपात अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्या दृष्टीने सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांन दिली. त्याच्या भोंदूपणाचे अनेक किस्से या भागात जनतेच्या चर्चेत आहेत.