भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा; रोहित पवारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट
मुंबई: नवनिर्वाची आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यांची भेट घेतली. दरम्यान पुण्यातील भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी त्यांनी चर्चा केली.
रोहित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यामुळेच मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले होऊन त्या आज वेगवेगळ्या क्षेत्रांत भरारी घेत आहेत. एका अर्थाने भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. पण आज याच भिडे वाड्याची खूप दुरवस्था झाली. यापूर्वी आघाडी सरकार असताना तत्कालीन मंत्री छगन भुजबळ साहेबांनी यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन विकास केला होता. पण मागच्या सरकारने याकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे आज या वाड्याची दुरवस्था झाली.
सदर विषय शासनाच्या अजेंड्यावर घेऊन याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन अमित देशमुख यांनी दिलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळेल आणि भिडे वाड्याचा विकास वेगाने होईल, असा मला विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.